
जळगाव | महाराष्ट्र न्यूजवाले प्रतिनिधी:
जळगाव जिल्ह्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची मतमोजणी आणि नाताळ (ख्रिसमस) सणाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. अप्पर जिल्हादंडाधिकारी संपूर्ण जिल्ह्यात १६ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२५ या कालावधीत प्रतिबंधात्मक (जमाबंदी) आदेश लागू केले आहेत.
प्रमुख निर्बंध आणि नियम:
कालावधी: हे आदेश १६ डिसेंबर २०२५ रोजी रात्री १२.०१ वाजेपासून ते ३० डिसेंबर २०२५ रोजी रात्री १२.०० वाजेपर्यंत अंमलात राहतील.
कायदेशीर तरतूद: मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) आणि (३) अन्वये हे निर्बंध लादण्यात आले आहेत.
बंदी असलेल्या बाबी: या काळात पाच किंवा पाचपेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र जमणे, बेकायदेशीर सभा घेणे, मिरवणुका काढणे, शस्त्रे किंवा स्फोटके बाळगणे आणि प्रतिमा दहन करणे यावर पूर्णपणे बंदी असेल.
सवलती:
हे आदेश सरकारी कार्यक्रम, अंत्ययात्रा, लग्न समारंभ आणि धार्मिक मिरवणुका यांना लागू नसतील. तसेच कर्तव्यावर असणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांनाही यातून सवलत देण्यात आली आहे.
निवडणुकीच्या निकालानंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि सण शांततेत साजरे व्हावेत, या हेतूने हे प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

Leave a Reply